मोगरा लागवड प्रशिक्षण – मराठी | Mogra Plantation – Marathi

GP
Global Parli
4 already enrolled

About This Course

मोगरा ही सुवासिक फुलांची एक वनस्पती आहे. ही प्रजाती ओलिएसी कुलातील आहे.या प्रजातीत जाई (चमेली),जूई,मोगरा इत्यादी सुमारे २०० विविध सुवासिक फुलांचा समावेश होतो. ही बहुवर्षीय व सदाहरित वनस्पती असून यांपैकी काही वेलीसारख्या पसरणाऱ्या, काही झुडपांसारख्या वाढणाऱ्या,काही उष्ण व दमट हवामानात, तर काही  समशीतोष्ण कटिबंधात चांगल्या प्रकारे वाढतात. भारतात मुख्यत्वे करून या प्रकारच्या फुलांचा उपयोग वेण्या, गजरा व हार यांसाठी केला जातो.  तसेच परदेशात विशेषतः फ्रान्समध्ये त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्ये मिळविण्यासाठी होतो.

भारतात मोगरा, जाई, जुई यांची लागवड व्यापारी तत्त्वावर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांत केली जाते.या फुलांना मुंबइ, चेन्नई, बंगळुरू, नागपूर, हैद्राबाद, पुणे इ. मोठ्या शहरांत मोठी मागणी असते. महाराष्ट्रात या फुलांची शेती करणे, सोपे, सुटसुटीत व कमी खर्चाचे आहे. या फुलांना बाजारपेठेत वर्षभर सतत मागणी असते आणि चांगले बाजारभाव मिळतात. मोगरा (जॅस्मिनम सॅम्बॅक) : सर्वसाधारणपणे मोगरा ही वनस्पती झुडपाप्रमाणे वाढणारी असून उंची ९० – ११० सेंमी असते. फुले मोठी, पांढऱ्या शुभ्र रंगाची, एकेरी पाकळ्यांची अथवा दुहेरी पाकळ्यांची असून अत्यंत मधुर सुवासाची असतात. वर्षभरात उन्हाळी व पावसाळी असे फुलांचे दोन हंगाम असतात.

हवामान : सर्वसाधारण या सर्व प्रकारच्या वेली व झुडपे अत्यंत काटक आहेत. उष्ण व समशीतोष्ण हवामानात यांची वाढ चांगली होते. उष्ण व कोरडे हवामान, स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस या पिकास चांगला मानवतो. दिवसाचे किमान तापमान २५ – ३४ अंश से. आणि रात्रीचे १६ – २५ अंश से. तसेच ५५ – ६५ टक्के सापेक्ष आर्द्रता असावी. कडाक्याची थंडी, धुके व दव यांचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. मध्यम हिवाळा आणि सौम्य उन्हाळ्यात फुलांमधील सुगंधी द्रव्याचे प्रमाण वाढून अधिक उत्पादन मिळते.

जमीन : हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी ६० सेंमी. खोलीची आणि सामू ६.५ – ७.० असणारी जमीन निवडतात.

पूर्वमशागत : ही फुलपिके बहुवर्षीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर ८ – १० वर्षे त्याच ठिकाणी राहतात. याकरिता निवड केलेली जमीन २-३ वेळा उभी-आडवी नांगरून नंतर २-३ वेळा कुळवून एकसारखी करतात. आवश्यकतेनुसार तणनाशकाचा वापर करून लव्हाळा-हराळी यासारख्या तणांचे नियंत्रण करतात. फुलपिकाचा प्रकार व जमिनीच्या गुणधर्मानुसार शिफारस केलेल्या अंतरावर ठरावीक आकाराचे खड्डे घेतात. खड्डे भरण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात अर्धा ते एक किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश तसेच २.० टक्के मिथिल पॅराथिऑन किंवा लिन्डेन पावडर व थिमेट टाकतात. जून महिन्यापूर्वी असे खड्डे लागवडीस तयार ठेवतात.

लागवड : मोगऱ्यासाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत १.२० X १.२० मीटरवर ६०X६० सेंमी आकाराचे खड्डे लागवडीस तयार ठेवतात. कमी अंतरावर लागवड केल्यास रोग किडींचा प्रादुर्भाव वाढून फुलांची प्रत बिघडते. मोगऱ्याच्या गुंडुमलई जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे भारी जमिनीत १६००, मध्यम जमिनीत ३३३३, हलक्या जमिनीत २५०० झाडे प्रति हेक्टरी लावतात.

खते : खते देताना फुलपिकांचा प्रकार, झाडाचे वय, जमिनीचा सामू आणि खते देण्याची वेळ या बाबींचा विचार करून खते देतात. कृषि विद्यापीठातील संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की, प्रत्येक झाडास दरवर्षी १० किग्रॅ. शेणखत, २५ ग्रॅ. फेरस सल्फेट, ४ ग्रॅ. झिंक सल्फेट आणि ६० ग्रॅ. नत्र, १२० ग्रॅ. स्फुरद व १२० ग्रॅ. पालाश दोन हप्त्यात विभागून डिसेंबर व जून महिन्यात दिल्यास गुंडुमलई या जातीच्या फुलांचे अधिक उत्पादन मिळते. छाटणी झाल्यावर ८ – १० दिवसांनी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी १० – १० किग्रॅ., १०० – १०० किग्रॅ. ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे मिश्रण करून त्या मिश्रणाचा ढीग वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून आठवडाभर ठेवतात. एक आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून एक हेक्टर क्षेत्रातील जास्मिनवर्गीय झाडांना बुंध्याभोवती घालतात. ही जैविक खते आणि जैविक बुरशीनाशके दरवर्षी छाटणीनंतर १०-१५ दिवसांनी देतात. त्यामुळे जमिनीत मुळाभोवती हवेतील नत्र स्थिरीकरण स्फुरदाचे द्रव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते. ट्रायकोडर्मामुळे जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन : पाण्याच्या बाबतीत जेव्हा गरज भासेल तेव्हा साधारणपणे जमिनीच्या आवश्यकतेनुसार  हिवाळ्यात १० – १२ दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ – १० दिवसांनी देता येते.

वेलीची-झुडपांची छाटणी : दरवर्षी फुलांच्या अधिक उत्पादनासाठी या फुलापिकांना नवीन फुटीचे प्रमाण जास्तीत जास्त असणे गरजेचे असते. यासाठी झाडावरील जुन्या रोगट कमकुवत व दाटीवाटीने वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असते. प्रकारानुसार वेलीची व झुडपांची हलकी ते मध्यम प्रमाणात छाटणी करतात. छाटणी करताना जमिनीच्या पृष्ठभागापासून अंदाजे ४५ – ६० सेंमी. उंचीवर सर्व फांद्या छाटतात. मोगरा छाटणी नोव्हेंबर महिन्यात करतात, तसेच फेब्रुवारीत करतात. छाटणी झाल्यावर झाडाच्या आजू-बाजूतील तण तणनाशकाचा वापर करून नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे खांदणी करून झाडांना मातीची भर देतात. भरपूर फुलांचे उत्पादन सुगंधी द्रव्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जाईवर सायकोसील या संजीवकाची १००० प्रति दशलक्षांश या प्रमाणात फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या आठवड्यात अशा दोन फवारण्या कराव्या लागतात.

उत्पादन : आर्थिक दृष्ट्या किफायतशीर उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून मिळावयास सुरुवात होते व पुढे ७ – ८ वर्ष उत्पादन मिळते. मोगऱ्याच्या फुलांचे उत्पादन ३-४ वर्षांनी सरासरी 8 – 9 टन प्रति हेक्टरी मिळते.

किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण : कीड : जास्मिनवर्गीय फुलपिकांवर सहसा किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. काही वेळेस पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आणि मावा यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यांच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फॉन ०.०५ टक्के किंवा डायमेथोएट, ०.२ टक्के किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ८ – १० दिवसाच्या अंतराने फवारतात. कोळी या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास केलथेन ०.४ टक्के किंवा पाण्यात विरघळणारे गंधक याची फवारणी ७ – ८ दिवसांच्या अंतराने करतात.

रोग : मोगरा या फुलपिकावर पानांवर काळे ठिपके पडून वेलीची संपूर्ण पाने करपून गळून पडतात आणि फुलांच्या उत्पादनात घट होते. या रोगाचे परिणामकारक नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डॅझिम १ टक्का किंवा बेनलेट १ टक्का, डायथेन एम-४५ या बुरशीनाशकाची २ टक्के या प्रमाणात ८ – १० दिवसांच्या अंतराने फवारणी करतात. मोगरा  या फुलपिकांवर काही वेळेस भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. त्याच्या नियंत्रणासाठी फेन्कॅनॉझोल ०.०५ टक्के किंवा डिनोकॅप ०.०५ टक्के डायफेन्कॅनॉझोल ०.०५ टक्के यांपैकी एका बुरशीनाशकाची रोगाचा प्रादुर्भाव दिसताच दर १० – १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक भुकटी ३०० मेश हेक्टरी २० – २५ किग्रॅ. धुराळ करतात.

Curriculum

7 Lessons

मोगरा भाग 1 लागवड पूर्व | Mogra Section 1 Pre-Plantation

Part 1 | Introduction | प्रस्तावना00:00:54Preview
Part 2 | Pre Plantation | लागवडीसाठी जमीन तयार करणे00:00:38
Part 3 | Plantation / Water Management | लागवड प्रक्रिया / पाणी व्यवस्थापन00:00:51

मोगरा भाग 2 लागवड करताना | Mogra Section 2 During-Plantation

Free
Lectures
7 lectures
Subject
Wishlist 0
Open wishlist page Continue shopping